घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर पडणार महागात;अंबड पुरवठा विभागाची मोठी कारवाई

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

अंबड शहरात व्यावसायिक कामांसाठी घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने आपली मोहीम तीव्र केली असून सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करण्यात आली आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर आणि तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पुरवठा अधिकारी किरणकुमार खांडेभराड यांच्या पथकाने शहरातील विविध हॉटेल्स आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर अचानक छापे टाकले.या तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅस ऐवजी स्वस्त दरातील घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे उघड झाले, ज्यानंतर पथकाने तत्काळ ४ सिलिंडर जप्त केले.गॅस सिलिंडर सोबतच प्रशासनाने शहरातील ३ पेट्रोल पंपांचीही कसून तपासणी केली असून तेथील दैनंदिन साठा,सुरक्षिततेचे नियम आणि तांत्रिक बाबींची पडताळणी करत पंप चालकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

या मोहिमेबाबत माहिती देताना तालुका पुरवठा अधिकारी किरणकुमार खांडेभराड यांनी स्पष्ट केले की,घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणे हे नियमांचे उल्लंघन असून ही मोहीम भविष्यातही अशीच सुरू राहणार आहे. केवळ कमर्शियल गॅसचाच वापर करावा,अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी व्यावसायिकांना दिला आहे.प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे नियमबाह्य काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून,सर्वसामान्य नागरिकांमधून या सक्रिय भूमिकेचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!