सूर्योदय विशेष
मराठवाड्याची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या जायकवाडी (नाथसागर) धरणातून रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या हालचालींना हिरवा कंदील मिळाला.या निर्णयामुळे घनसावंगी आणि अंबड विधानसभा मतदारसंघाच्या सीमा क्षेत्रातील पिकांना नवसंजीवनी मिळणार असली,तरी या भागातील राजकीय वर्तुळात मात्र पाण्याचे श्रेय लाटण्यासाठी राजेश टोपे,हिकमत उढाण आणि सतीश घाडगे पाटील यांच्यात जोरदार त्रिकोणी राजकीय संघर्ष पेटला असून नेत्यांमधील श्रेयवादाची लढाई चव्हाट्यावर आली आहे.
या पाणी प्रश्नावर भाजप नेते तथा समृद्धी साखर कारखान्याचे प्रमुख सतीश घाडगे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेने आधीच राजकीय वातावरण तापवले होते.गोदाकाठच्या वाळणाऱ्या ऊस व रब्बी पिकांसाठी जायकवाडीतून तातडीने पाणी न सोडल्यास थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा घाडगे यांनी दिला होता. त्यांच्या समर्थकांचा दावा आहे की, घाडगे यांनी थेट जलसंपदा मंत्र्यांच्या भूमिकेला आव्हान देत निर्माण केलेल्या जनदबावामुळेच सरकारला ही बैठक घेऊन तातडीने आवर्तन सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. निर्णय झाल्यानंतर त्यांनी प्रशासनाचे आभार मानले असले,तरी हा निर्णय आपल्याच आक्रमक लढ्याचा आणि थेट संघर्षाचा परिणाम असल्याचे सांगत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर राजकीय कुरघोडी केली आहे.
दुसरीकडे,महायुतीचे स्थानिक नेते आमदार हिकमत उढाण यांच्या समर्थकांनीही सोशल मीडियावर जोरदार बॅनरबाजी सुरू करत या मैदानात उडी घेतली आहे.उढाण यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घनसावंगी विधानसभा क्षेत्रासाठी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यासोबतच गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधारे (बॅरेजेस) भरून देण्याची लेखी मागणी केली होती.उढाण यांच्या या प्रभावी शासकीय पाठपुराव्यामुळे आणि मंत्रालयातील वजनामुळे विभागाने पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केला,असा प्रचार त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणावर केला जात असून स्वतःचे राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न या गटाकडून सुरू आहे.
या दोन्ही सत्ताधारी नेत्यांच्या दाव्यांना आणि आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गटाने चोख प्रत्युत्तर दिले आहे.टोपे यांनी पाटबंधारे विभागाकडे सातत्याने केलेल्या तांत्रिक पाठपुराव्यामुळेच हे पाणी मंजूर झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. विशेष म्हणजे,राजेश टोपे यांनी या वादात आणखी आक्रमक पाऊल टाकत,धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने केवळ जुजबी आवर्तने देऊन विरोधकांनी स्वतःची पाठ थपटून घेऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.शेतकऱ्यांना हक्काची ५ आवर्तने (३ रब्बी आणि २ उन्हाळी) मिळालीच पाहिजेत, ही नवी आग्रही मागणी करत त्यांनी सत्ताधारी दोन्ही नेत्यांवर नवीन राजकीय दबाव निर्माण करून कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्थानिक पातळीवर आणि सोशल मीडियाच्या पडद्यावर आज तिन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या निवेदनांची आणि जाहिरातींची मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. डाव्या कालव्यातून पाणी सोडणे असो वा नदीवरील बंधारे भरणे,प्रत्येक निर्णयाचे मूळ श्रेय स्वतःच्याच नेत्याकडे कसे जाते,हे सिद्ध करण्यासाठी तिन्ही गटांकडून मंत्र्यांसोबतचे जुने फोटो, निवेदने आणि आंदोलनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.आयत्या पिठावर रेघोट्या कोण ओढतंय,यावरून कार्यकर्त्यांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली असून ऐन रब्बी हंगामात हा पाणी प्रश्न पूर्णपणे राजकीय संघर्षाच्या विळख्यात अडकला आहे.
एकंदरीत,जायकवाडी धरणातील पाण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असले,तरी या निमित्ताने घनसावंगी-अंबड परिसरातील आगामी राजकीय समीकरणांची आणि वर्चस्वाची रंगीत तालीम पाहायला मिळत आहे. पाणी सुटण्याच्या या शासकीय निर्णयाचे भांडवल करत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात स्वतःचा वरचष्मा सिद्ध करण्यासाठी या तिन्ही नेत्यांमध्ये आणि त्यांच्या पक्षांमध्ये राजकीय इर्ष्या पराकोटीला पोहोचली आहे.