गोंदीत पदभार स्वीकारताच स.पो.नि. अमोल गुरलेंचा धडाका! शहागडमध्ये मध्यरात्री छापा,सव्वा दोन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

अवघ्या दोन दिवसांपूर्वीच गोंदी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले यांनी आपल्या धडक कारवायांना सुरुवात केली आहे. गोंदी पोलीस आणि पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने शहागड (ता.अंबड) येथील वाळकेश्वर नगर परिसरात मध्यरात्री संयुक्त कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधीत पान मसाला,तंबाखू आणि गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत एका अप्पे रिक्षासह तब्बल २ लाख १९ हजार ७०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

विशेष बाब म्हणजे, स.पो.नि. अमोल गुरले यांनी दोन दिवसांपूर्वीच गोंदी पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली आहेत आणि पदभार स्वीकारताच त्यांनी अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, ५ जून २०२६ रोजी मध्यरात्री ००.५० वाजताच्या सुमारास गोंदी पोलीस आणि पोलीस अधीक्षक जालना यांच्या विशेष पथकाने शहागड येथील वाळकेश्वर नगरमध्ये एका अप्पे रिक्षावर (क्र. एम.एच. २८ ए.बी. ३७२०) छापा टाकला.या रिक्षामध्ये शासनाने बंदी घातलेला गुटखा आणि सुगंधीत पान मसाला आढळून आला. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष रीतसर पंचनामा करून रिक्षा व गुटख्यासह सदर मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी रहिम रहेमान शेख (वय ३२ वर्षे, रा. वाळकेश्वर नगर,शहागड ता.अंबड) या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १७४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. गुरले यांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.सदरची कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधु,अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि अंबड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.ही धडक मोहीम गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. अमोल गुरले,पोलीस अधीक्षक पथकाचे सपोनि अविनाश गडाख,सहाय्यक फौजदार बर्डे,पोलीस हवालदार कोकणे, पोलीस हवालदार  केंद्रे,महिला पोलीस शिपाई बोराडे,महिला पोलीस शिपाई पाजगे आणि चालक पोलीस शिपाई जयवाळ यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!