सूर्योदय वृत्तसेवा
बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एका मोठ्या कारवाईत जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना ६ लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या राहत्या घरी करण्यात आली. अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशीन आणि हायवा टीप्परवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी ही लाचेची मागणी केली होती. महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यालाच लाच घेताना पकडल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील ३६ वर्षीय तक्रारदाराचा अवैध वाळू उपसा करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी तहसीलदार चव्हाण यांनी प्रति दिवस प्रमाणे ८ दिवसांचे १२ लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी ८ लाख रुपये तक्रारदाराने त्यांना आधीच दिले होते. त्यानंतर,आरोपी तहसीलदाराने उर्वरित ४ लाख रुपये आणि ६ हायवा टीप्परला वाळू वाहतुकीची परवानगी देण्यासाठी प्रति टीप्पर ५० हजार रुपये प्रमाणे ३ लाख रुपये असे एकूण ७ लाख रुपयांची नवीन लाच मागणी केली.
लाचेची ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २६ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बीड येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केली असता, तहसीलदार चव्हाण यांनी तडजोडीअंती पोकलेनचे उर्वरित ४ लाख आणि ६ हायवा टीप्परसाठी प्रत्येकी ४० हजार रुपये प्रमाणे २ लाख ४० हजार रुपये, असे एकूण ६ लाख ४० हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर,ठरल्याप्रमाणे ६ जून २०२६ रोजी ला.प्र.वि. बीडच्या पथकाने सापळा रचला आणि ६ लाख ४० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना तहसीलदार चव्हाण यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगरमधील वेस्ट बीड बायपास रोडवरील कासलीवल मार्वल सोसायटीत करण्यात आली. आरोपी तहसीलदाराच्या अंगझडतीमध्ये एक सॅमसंग मोबाईल,ॲपल घड्याळ,पिवळ्या धातूच्या दोन अंगठ्या व एक प्रिंटेड पेंडाल लॉकेट आणि ६३७० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.याप्रकरणी सातारा पोलीस ठाणे,छत्रपती संभाजीनगर शहर येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.