जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा:उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने आरोपींची मोठी कोंडी;आता पोलिसांना शरण आल्याशिवाय उरला नाही दुसरा पर्याय

जालना | विशेष प्रतिनिधी

जालना जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या आणि प्रशासकीय यंत्रणेला काळिमा फासणाऱ्या बहुचर्चित जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्या’तील फरार आरोपींच्या गळ्याभोवती आता कायद्याचा फास घट्ट आवळला गेला आहे. या महाघोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपींनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. मात्र,सरकारी तिजोरीवर पडलेला दरोडा आणि तपासाचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने या सर्वांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.न्यायालयाच्या या ऐतिहासिक दणक्यानंतर आता सर्व फरार आरोपींची रवानगी तुरुंगात होणे निश्चित मानले जात असून,त्यांना पोलिसांना शरण आल्याशिवाय आता कोणताही पर्याय उरलेला नाही.

कायदेशीर लढाईत आरोपींना मोठा धक्का

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा बोगस लाभार्थ्यांच्या नावे वळवून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका या आरोपींवर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे आरोपी पोलिसांना हुलकावणी देत होते. त्यांनी जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत धावपळ केली. मात्र, शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्राथमिक पुरावे समोर आल्याने न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.”हा केवळ पैशांचा अपहार नसून गरीब शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे,”अशा कडक शब्दांत ताशेरे ओढत न्यायालयाने आरोपींची कोंडी केली आहे.

खासगी दलाल आणि सूत्रधारांचे धाबे दणाणले

या घोटाळ्यात केवळ महसूल विभागातील काही अधिकारीच नाही,तर गावोगावी पसरलेले खासगी दलाल (एजंट) यांचे एक मोठे जाळे सक्रिय होते. हे दलाल शेतकऱ्यांची कागदपत्रे गोळा करून प्रशासकीय यंत्रणेत फेरफार करत असत. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर या दलालांचे पाठीराखे आणि राजकीय वरदहस्त असलेले लोकही आता मागे सरकले आहेत.कायदेशीर संरक्षण मिळण्याची शेवटची आशाही मावळल्याने आता या आरोपींसमोर शरणागती पत्करण्याशिवाय कोणतीही पळवाट उरलेली नाही.

पोलीस प्रशासनाचा वाढता दबाव आणि अटकेची तयारी

उच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेला (EOW) तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.फरार आरोपींचे लोकेशन ट्रेस करण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. आरोपींच्या घरावर आणि नातेवाईकांच्या ठिकाणांवर पोलिसांचा खडा पहारा असून,त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते.पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,काही आरोपींनी शरणागती पत्करण्यासाठी वकिलामार्फत पोलिसांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यात खळबळ:मोठे मासे गजाआड जाणार?

या घोटाळ्याची व्याप्ती पाहता, काही आरोपींनी शरणागती पत्करली तर यामागील मोठे सूत्रधार आणि इतर सहभागी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारणारे हे ‘पांढरपेशी’ दलाल आता तुरुंगाच्या वाटेवर असल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आता सर्वांचे लक्ष हे आरोपी पोलीस ठाण्यात कधी हजर होतात, याकडे लागले आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!