अंबडच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रशासनाचा अमानुष खेळ;मुलींच्या ताटात अळ्या,पिण्याला गटाराचे पाणी….

समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी

सूर्योदय वृत्तसेवा|अंबड

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून घरापासून दूर आलेल्या मागासवर्गीय मुलींच्या जीवाशी इथले भ्रष्ट आणि निर्ढावलेले प्रशासन कसा निर्लज्जपणे खेळत आहे, याचा अत्यंत संतापजनक आणि किळसवाणा प्रकार अंबड येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात उघडकीस आला आहे. दैनिक सूर्योदय ने केलेल्या पाहणीत प्रशासनाच्या या अमानुष कारभाराचे वाभाडे निघाले आहेत.

ताटात अन्नाऐवजी चक्क विष!

वसतिगृहातील स्वयंपाकघरात प्रशासनाने अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरवले असून मुलींच्या ताटात अन्नाऐवजी चक्क विष वाढले जात असल्याचे उघड झाले आहे. २७ मार्चच्या जेवणातील मसाला बटाटा भाजीत चक्क अळ्या वळवळताना आढळल्या, तर सकाळच्या नाश्त्यात प्रशासनाने चक्क उंदराच्या लेंड्या (विष्ठा) खाऊ घातल्याचा भयंकर प्रकार मुलींनी जबाबात उघड केला आहे. पिण्याचे आणि स्वयंपाकाचे पाणी अत्यंत दूषित, दुर्गंधीयुक्त आणि किडे पडलेले आहे. छतावरील सिंटेक्स टाकीत अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी साचले असून तेच गटारासारखे पाणी मुलींना पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी दिले जात आहे. तांदूळ आणि ज्वारीत किडे असतात आणि पोळ्यांचे पीठ इतके निकृष्ट आहे की पोळ्या कडक दगडासारख्या होतात. एवढेच नाही तर, खराब अंडी दिली जातात, मटण कधीच मिळत नाही आणि चिकनच्या नावाखाली अत्यंत खराब दर्जाचे मांस दिले जाते. तसेच,जेवणात मेन्यू प्रमाणे भाज्या दिल्या जात नाहीत तर एकच बटाट्याची भाजी वारंवार दिली जाते.

आजारी पडल्यास उपचारास बंदी;सॅनिटरी पॅड्सही लपवले

मुली आजारी पडल्या तर त्यांना उपचाराविना मरायला सोडले जाते की काय,असा प्रश्न पडावा इतकी भयानक परिस्थिती येथे आहे. वसतिगृहाच्या स्टोअर रूममध्ये सॅनिटरी नॅपकिनचा साठा पडून आहे, मात्र तो विद्यार्थिनींना हेतुपुरस्सर दिला जात नाही.एखादी मुलगी आजारी पडल्यास साधी प्रथमोपचार पेटीही तिथे उपलब्ध नाही.सर्वात संतापजनक म्हणजे, वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात जाण्याचीही परवानगी या हुकूमशाही प्रशासनाकडून दिली जात नाही.वॉटर हिटर (टाकी) तुटलेले असल्याने मुलींना गरम पाणी मिळत नाही.कम्प्युटर लॅब आणि राहण्याच्या रूममध्ये पंखे आणि लाईट्स नादुरुस्त अवस्थेत आहेत.

वसतिगृह की सापांचे जंगल?

या वसतिगृहाची अवस्था एखाद्या कोंडवाड्यापेक्षा किंवा सापांच्या जंगलापेक्षा कमी नाही. वसतिगृहाबाहेर आणि परिसरात कचऱ्याचे मोठे ढीग साचले असून वाढलेल्या झाडाझुडपांमुळे परिसरात चक्क दोन ते तीन वेळा साप निघाल्याची धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी माहिती समोर आली आहे. याशिवाय मुलींची आर्थिक लूटही राजरोसपणे सुरू आहे. शासनाकडून येणारा निर्वाह भत्ता वेळेवर दिला जात नाही आणि तो नक्की किती मिळतो, हेही मुलींपासून जाणीवपूर्वक लपवले जाते.तसेच अधीक्षिका मुलींसोबत दुजाभाव करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

या भयंकर,अमानुष आणि जीवघेण्या कारभाराविरोधात तब्बल ३५ विद्यार्थिनींनी स्वाक्षरीनिशी आपला लेखी जबाब नायब तहसीलदारांसमोर दिला आहे.मुक्या जनावरांनाही दिली जाणार नाही अशी वागणूक या मागासवर्गीय मुलींना देणाऱ्या या निर्लज्ज अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे. प्रशासन अजून किती मुलींच्या जिवावर बेतण्याची वाट पाहत आहे?

पुढील भाग लवकरच…..

Leave a Comment

error: Content is protected !!