सूर्योदय वृत्तसेवा
अंबड तालुक्यातील रुई येथे एका ४६ वर्षीय व्यक्तीची अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने अमानुष हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान राहत्या घरी हा थरारक प्रकार घडला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप धुराजी राजगुरु (वय ४६,रा. रुई,ता.अंबड,जि.जालना) असे या हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप राजगुरु हे त्यांच्या रुई येथील घरी असताना दिनांक ८ एप्रिल रोजी रात्री नऊ ते ९ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान हा भयानक प्रकार घडला.अज्ञात मारेकऱ्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कोणत्यातरी धारदार शस्त्राने दिलीप यांच्या तोंडावर आणि छातीवर सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.सकाळी हा भयानक प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक,अंबड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
या अमानुष हत्येप्रकरणी मयताचे मोठे भाऊ प्रल्हाद धुराजी राजगुरु यांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास सपोनि वैशाली पवार यांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुरनं. ६५/२०२६ अन्वये,भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सध्या या खुनामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसून आरोपीही फरार आहेत.या अत्यंत गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक जानवी बी. शेखर यांच्याकडे सोपवण्यात आला असून, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आला आहे.