बीड पॅटर्न जालन्यात कधी राबवणार? खेडोपाडी थाटलेल्या तोतया डॉक्टरांवर धडक कारवाईची गरज

आरोग्य यंत्रणेच्या संशयास्पद मौनावर प्रश्नचिन्ह;सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबणार कधी?

विशेष प्रतिनिधी/जालना

शेजारील बीड जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आलिशान क्लिनिक थाटून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका तोतया डॉक्टरचा पर्दाफाश केला बीडमधील या धडक कारवाईनंतर आता जालना जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर आणि खेडोपाडी सुरू असलेल्या बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बीड प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या कठोर निर्देशानंतर तपासणी मोहीम तीव्र केली असताना जालन्यातील आरोग्य विभाग मात्र कुणाच्या आशीर्वादाने डोळेझाक करत आहे, असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.

बीड शहरात कोणतीही वैध वैद्यकीय पदवी नसताना एका महाशयाने चकचकीत दवाखाना सुरू करून सर्रास रुग्णांवर उपचार चालवले होते, ज्याची पदवी अखेर तपासणीत बनावट निघाली अगदी अशीच भयावह परिस्थिती आज जालना जिल्ह्यातील ग्रामीण आणि निमशहरी भागात पाहायला मिळत आहे.बदनापूर,भोकरदन, जाफ्राबाद,मंठा,परतूर,अंबड आणि घनसावंगी यांसारख्या तालुक्यांमधील वाड्या-वस्त्यांवर वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही गंध नसलेले अनेक तोतया डॉक्टर राजरोसपणे अ‍ॅलोपॅथीची औषधे, सलाईन आणि इंजेक्शन देऊन रुग्णांच्या आरोग्याशी उघड जुगार खेळत आहेत.अशा भामट्यांना वेळीच चाप लावण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या बोगस डॉक्टर शोध समित्या सध्या केवळ कागदावरच उरल्या आहेत.

नियमित तपासणी मोहीम थंड का पडली, ग्रामीण भागात थाटलेल्या या क्लिनिक्सना कोणाचा राजकीय अथवा प्रशासकीय वरदहस्त लाभला आहे आणि एखादा गंभीर प्रकार घडून निष्पाप रुग्णाचा जीव गेल्यावरच यंत्रणा जागी होणार का, असे अनेक अनुत्तरित प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आले आहेत.बीड जिल्हा प्रशासनाने दाखवलेली तत्परता जालन्यातील जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य यंत्रणेनेही दाखवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखाने,तिथल्या डॉक्टरांचे नोंदणी प्रमाणपत्र आणि वैद्यकीय पदव्यांची तात्काळ सखोल फेरतपासणी करावी,अशी मागणी जोर धरू लागली असून आता जालना प्रशासन यातून धडा घेऊन कारवाई करणार की केवळ बघ्याची भूमिका घेणार,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

पुढील भाग लवकरच…..

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!