सूर्योदय वृत्तसेवा|जालना
अंबड तालुक्यातील मौजे वलखेडा येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहातील भोंगळ कारभाराची तक्रार झाली,प्रशासनाकडून त्याची तत्परतेने चौकशीही झाली आणि गंभीर त्रुटींचा पाढा वाचणारा अहवाल थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर पोहोचला.मात्र,हे सर्व होऊन आज पंधरवडा उलटला तरीही दोषींवर कोणतीही कारवाई न झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दिनांक २७ मार्च २०२६ रोजी या वसतीगृहातील विद्यार्थिनींनी आपल्या समस्या मांडण्यासाठी थेट अंबड तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून निवेदन दिले होते.अधिकाऱ्यांसमोर या गंभीर परिस्थितीबाबत चर्चा करत असतानाच दोन विद्यार्थिनींना अचानक चक्कर आली. निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे या मुलींनी मागील दोन-तीन दिवसांपासून अपुरे जेवण केल्याचे विदारक वास्तव यातून समोर आले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदारांनी तात्काळ निवासी नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली दोन महिला सदस्यांसह एक समिती गठीत करून प्रत्यक्ष पाहणीचे आदेश दिले होते.या समितीने त्याच दिवशी प्रत्यक्ष पाहणी करून जो पंचनामा आणि अहवाल सादर केला,तो अतिशय धक्कादायक होता.
समितीच्या पाहणीत स्वयंपाकघरात प्रचंड अस्वच्छता असून, जेवणामध्ये अळ्या, किडे आणि चक्क उंदराच्या लेंड्या आढळून आल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. विद्यार्थिनींना पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरले जाणारे पाणी अत्यंत दूषित, दुर्गंधीयुक्त आणि किडेयुक्त होते. नाष्ट्यात दिले जाणारे दूध आणि जेवणातील तांदूळ, पीठ, चिकन हे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. मेन्यू कार्डला हरताळ फासत वारंवार केवळ बटाट्याची भाजीच दिली जात असल्याचेही उघडकीस आले.वसतीगृहात कोणतीही प्रथमोपचार सुविधा (First Aid) उपलब्ध नसून,वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतही मुलींना वेळेवर बाहेर जाऊ दिले जात नाही. तसेच, वसतीगृह परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा व झाडे-झुडपे वाढलेली असल्याने तिथे दोन-तीन वेळा साप निघाल्याच्या धोकादायक घटना घडल्या आहेत. याशिवाय मूलभूत सुविधांचाही बोजवारा उडाला असून गरम पाण्यासाठीची सौर ऊर्जेची टाकी तुटलेली आहे.अभ्यासिकेत आणि कॉम्प्युटर लॅबमध्ये लाईट-फॅन नादुरुस्त आहेत. सर्वात संतापजनक म्हणजे स्टोअर रूममध्ये सॅनिटरी नॅपकिनचा साठा पडून असूनही तो विद्यार्थिनींना दिला जात नसल्याचे पंचनाम्यात निष्पन्न झाले आहे.
सदर परिस्थिती विद्यार्थिनींच्या आरोग्यास व सुरक्षिततेस अत्यंत धोकादायक असल्याने,अंबडच्या तहसीलदारांनी पुढील कडक कार्यवाहीसाठी हा वस्तुनिष्ठ अहवाल दिनांक ३० मार्च २०२६ रोजी जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे सविनय सादर केला.तहसील कार्यालयाने तात्पुरती मदत म्हणून विद्यार्थिनींना एक वॉटर फिल्टरही उपलब्ध करून दिला आहे.परंतु, एवढा गंभीर अहवाल वरिष्ठांकडे जाऊन आज पंधरा दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही वसतीगृहातील या भयानक परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाची ही डोळेझाक कुणाच्या दबावाखाली सुरू आहे? मुलींच्या जिवाशी खेळणाऱ्या दोषींना कुणाचे अभय आहे? आणि कारवाईसाठी प्रशासन अजून एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असे संतप्त सवाल आता सर्वसामान्यांमधून विचारले जात आहेत. प्रशासनाने तात्काळ मौन सोडून दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.