अंबडमधील निष्काळजीपणाच्या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संताप;अनधिकृत संस्थांचे सर्वेक्षण करून कठोर कारवाई करण्याची गरज
सूर्योदय वृत्तसेवा जालना
पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून शहरात येणाऱ्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवाशी जिल्ह्यातील काही खाजगी करिअर अकॅडमी कसा जीवघेणा खेळ करत आहेत, याचा भयंकर प्रकार अंबड तालुक्यात उघडकीस आला आहे. एका खाजगी अकॅडमीच्या अमानुष निष्काळजीपणामुळे १९ वर्षीय प्रीती भाकड या तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, आता माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात थेट लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर अकॅडमींना कुलूप ठोकावे,अशी आक्रमक मागणी जोर धरू लागली आहे.पोलीस भरती पूर्व तयारीसाठी अंबड येथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रीतीला, पोहता येत नसतानाही आणि सुरक्षेची कोणतीही साधने उपलब्ध नसताना, अकॅडमीचे संचालक गोकुळ बारवाल आणि ट्रेनर गणेश वायसे यांनी वलखेडा शिवारातील निर्जन खदानीत उतरण्यास भाग पाडले. पाण्याचा अंदाज न आल्याने प्रीतीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना केवळ एक अपघात नसून, पैशांच्या हव्यासापोटी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी केलेली घोर तडजोड व संतापजनक निष्काळजीपणा असल्याचे उघड झाले आहे.
सध्या जालना जिल्ह्याच्या विविध भागात ‘पोलीस आणि लष्कर भरतीपूर्व प्रशिक्षण’ देणाऱ्या खाजगी अकॅडमींचे अक्षरशः पेव फुटले आहे. ग्रामीण भागातून मोठ्या आशेने येणाऱ्या तरुणांच्या भावनांशी आणि पैशांशी खेळण्याचे काम यातील अनेक संस्था करत आहेत.
प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर उपस्थित होणारे गंभीर प्रश्न
या सर्व खाजगी अकॅडमी चालवण्यासाठी त्यांच्याकडे शासनाच्या किंवा स्थानिक प्रशासनाच्या अधिकृत परवानग्या आहेत का?
विद्यार्थ्यांच्या मैदानी प्रशिक्षणासाठी योग्य मैदाने, जीवरक्षक साधने आणि खरोखरच प्रशिक्षित कर्मचारी (Trainer) उपलब्ध आहेत का?
आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
अनेक ठिकाणी कोणतीही अधिकृत नोंदणी नसताना केवळ मोठे फलक लावून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. मात्र, स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्यानेच अशा अकॅडमी चालकांचे फावले आहे.एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीचे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न या अकॅडमीच्या निष्काळजीपणामुळे खदानीत कायमचे बुडाले आहे. भविष्यात जिल्ह्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी या संपूर्ण प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व खाजगी करिअर आणि भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमींचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत. तसेच,ज्यांच्याकडे कायदेशीर परवानग्या नाहीत आणि जे सुरक्षेच्या मानकांचे पालन करत नाहीत, अशा संस्था तत्काळ सील करून संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करावेत.प्रशासनाने आता या ‘शिक्षणाच्या दुकानां’वर कायदेशीर वचक निर्माण करण्याची वेळ आली आहे.
पुढील भाग लवकरच